Saturday, 16 December 2017

रुद्राक्ष


रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव 'एलिओकार्पस स्फेरिकस' असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. साधारणतः समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर ही झाडे कपारित चांगली वाढतात. रुद्राक्षाचे झाड ८ ते १२ मीटर उंच असते. त्याची साल गडद करडी असते. या झाडाचे लाकूड, हलके, मजबूत व चिवट असते. फळ्या, खोकी, कपाटे बनवण्यास त्याचा उपयोग होतो. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. या फळातील गर आंबट चवीचा पांढुरका व चिकट असतो. मेंदुचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी ला रुद्राक्ष म्हणतात. ती कठीण आवरणाची व नक्षीदार असते खर्‍या रुद्राक्षाला आरपार भोक असते. त्याला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. हा पाण्यात टाकल्यास सरळ खाली जातो. त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. टांगलेल्या स्थितीत ते दक्षिणोत्तर दिशा दाखवतात. त्यांना किड लागत नाही. रुद्राक्ष हातात धरला तर स्पंदने जाणवतात. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम  धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात . कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात.
आजकाल खोटे रुद्राक्षही विकले जातात. भद्राक्ष व विकृताक्ष नावाची झाडे असतात. त्यांच्या बिया रुद्राक्षाच्या झाडांसारख्याच असतात. पण या बियांना भोक नसते. ते सुईने पाडले जाते. तसेच यांना काताच्या पाण्यात ठेवून त्यांना तांबूस रंग दिला जातो. त्यांमुळे असे खोटे रुद्राक्ष पाण्यात ठेवले तर त्याचा रंग धुतला जातो. हे खोटे रुद्राक्ष पाण्यावर तरंगतात. आणि त्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात. तेंव्हा रुद्राक्ष विकत घ्यायचा झाल्यास वरील गुणधर्म पाहूनच विकत घ्यावा. विशिष्ट रोग निवारण्यास रुद्राक्षाच्या माळा गळ्यात,दंडात, मनगटात, कमरेभोवती घालतात. रुद्राक्षावर पाणी ओतून ते पाणी पितात. काही वेळा आजार्‍याच्या उशी खालीही ठेवतात.रुद्राक्षाबद्दल काही समजुती पुढीलप्रमाणे ----
१.] एकमुखी रुद्राक्ष---  हि रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो. हि ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत. व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात.
२.] दोनमुखी रुद्राक्ष--- हा  रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते.
३.] तीनमुखी रुद्राक्ष---  अग्नीरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात.
४.] चारमुखी रुद्राक्ष --- याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही असे म्हणतात.
५.] पाचमुखी रुद्राक्ष--- हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यु येत नाही
६.] सहामुखी रुद्राक्ष--- कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो.
७.] सप्तमुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात.
८.] अष्टमुखी रुद्राक्ष--- याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते.
९.] नऊमुखी रुद्राक्ष--- काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा, पीडा,टळावी म्हणून याची पूजा केली जाते.
१०.] दहामुखी रुद्राक्ष--- जनार्दन स्वरूपात याची गणना होते.
११.] अकरामुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रूद्र प्रसन्न होतात.
१२.] बारामुखी रुद्राक्ष--- सूर्यस्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात.
१३.] तेरामुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते.
१४.] चौदामुखी रुद्राक्ष--- रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात.
१५.] पंधरावा गौरीशंकर रुद्राक्ष--- एकाच देठावर दोन मणी काही वेळा सापडतात,किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात, त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते. 

2 comments:

  1. अतिशय सुंदर माहितीपुर्ण लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  2. Cool and that i have a dandy give: Where To Remodel House house repair quotes

    ReplyDelete