Wednesday, 13 December 2017

पौष महिना शुभ कि अशुभ ?

पौष महिना शुभ कि अशुभ ?

वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत, इतके कि पौष सुरु झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात तर महत्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरच इतका वाईट आहे का ? याचा घेतलेला हा धांडोळा............

चैत्र माह वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैष आणि सहस्य अशी अन्य दोन नावंही आहेत. अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसं याला भाकडमास म्हटलं जाऊ लागलं. कारण मकर संक्रातीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत, असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णयसिंधु, धर्मसिंधु या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्यं सांगितली आहेत ती अशी -

१) पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघस्नानाला प्रारंभ करावा.
२) पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव (शाकंभरी नवरात्र) शारदीय नवरात्रौत्सवासारखा असतो.
३) पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण व ब्राह्मणभोजन करावं.
४) पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत.
५) शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी.
६) पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पीठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं.
७) महिनाभर एकवेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं.
८) रवि धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रवणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अन्हिकं उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात.
वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही, हे स्पष्ट होतं. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. पौष महिन्यात रवि धनुत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते, मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही.पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृपंधरवडाही सर्वच शुभकार्यासाठी वर्ज्यनसतो.पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये.
सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्रीखंडोबा आणि श्रीम्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घरखरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत.
काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रा वरून चैत्र, विशाखा वरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिष शास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो.
पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रुढी बनली आहे म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रुढी बलियेसी, असं वचन आहे, असा युक्तिवाद काहीजण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रुढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्नच झालेली रुढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रुढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य. दुसरा वेडय़ांच्या बाजाराला चाललाय म्हणून आपणही निघावं, हे काही खरं नाही.
आयुष्य मुळात छोटं आहे. खुळचट कल्पनाच्या नादी लागून एक महिना वाया कशाला घालवायचा?

स्तोत्र पठणाचे महत्व

*स्तोत्रपठणाचं महत्त्व*

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.

आ पलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.

डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.

आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.

संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवण
ी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?

आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.

ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.

तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.

आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.

शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल।

।। ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ।।

समर्पण

*समर्पण*

आपला देह आणि आपलं मन हे दोन्ही आज भौतिक जगात जखडलं आहे. त्यामुळेच देहाच्या आणि मनाच्या सर्व अवस्थांत भौतिक जगाचाच प्रभाव आहे. भौतिक जग हे अशाश्वत आहे. त्यामुळे देह आणि मनावर तसेच देह आणि मनाच्या अवस्थांवर अशाश्वताचाच प्रभाव आहे. आता धनाचा विचार करू. धन म्हणजे आपल्याला पैसा वाटतो. प्रत्यक्षात धन म्हणजे माझ्याकडे जे जे आहे ते. या धनाचे तीन प्रकार सांगता येतील. त्यातील दोन प्रकार म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म. माझ्याकडे स्थूल असे भौतिकही आहे त्याचप्रमाणे सूक्ष्म अशा क्षमताही आहेत. देहापासून ते भौतिक पसाऱ्यापर्यंतचे सारे काही स्थूल आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा समस्त क्षमता या सूक्ष्म आहेत. हे समस्त जगत स्थूल आणि सूक्ष्माने भरले आहे. त्याबरोबरच त्याची जी तिसरी अज्ञात मिती आहे ती दिव्य आहे! या चराचरात परमात्मा भरला आहे. तो जाणवेल तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म भौतिकातील दिव्यत्वही जाणवू लागेल. आता साधकापुरता थोडा विचार करू. देह आणि देहाच्या तीन अवस्था, मन आणि मनाच्या तीन अवस्था यांचा विचार केला की जाणवेल स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि त्यानंतर अतिसूक्ष्माकडे असा त्यांचा क्रम आहे. कारण देह आणि सुषुप्ती अवस्था या अतिसूक्ष्माचा संकेत करतात. भौतिकातील स्थूल आणि सूक्ष्मानंतर दिव्याची पातळी ही अतिसूक्ष्म आहे. तन, मन आणि धनाचं जसजसं समर्पण होत जाईल तसतसं या तिन्हींच्या अतिसूक्ष्म अवस्थेपर्यंत साधक पोहोचेल त्यानंतर त्याचं जीवन दिव्य होईल. आज आपण सद्गुरूंना आपण तन, मन, धन समर्पित केल्याचं नुसतं म्हणतो. प्रत्यक्षात त्या समर्पणाचा खरा अर्थही आपल्याला माहीत नसतो. तन, मन आणि धनाचं समर्पण म्हणजे काय? देहाचं समर्पण म्हणजे देहाच्या सवयींचा, देहबुद्धीचा, देहाच्या सुखासीनतेचा त्याग. मनाचं समर्पण म्हणजे मनाच्या सवयींचा, मनाच्या विकारवशतेचा, मनाच्या वासनालोलुपतेचा त्याग. धनाचं समर्पण म्हणजे धनासक्तीचा, भौतिकाच्या आसक्तीचा, भौतिकालाच सर्वस्व मानण्याच्या वृत्तीचा, भौतिकावर विसंबण्याच्या सवयीचा त्याग. आता तन, मन आणि धन या क्रमवारीतील धनाचा खरा अर्थ पाहू. हे धन म्हणजे आत्मा! आत्मस्वरूप हाच जिवाचा खरा आधार आहे. परमात्म्याचा हाच दिव्यांश आहे. त्या आत्मस्वरूपाची जाणीव होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन दिव्यत्वानं भरून जाईल. माणूस म्हणजे नुसतं शरीर किंवा मन नव्हे. शरीर, मन आणि आत्मा यांची तो त्रयी आहे. पू. बाबा बेलसरे यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘शरीर आणि मन यांना सर्वस्व मानून आत्म्याला विसरणे म्हणजे आत्महत्याच आहे!’ तेव्हा शरीर आणि मनात ज्या आसक्तीनं मन अडकलं आहे त्या आसक्तीचा त्याग म्हणजे तन आणि मनाचं समर्पण आहे. त्यानंतर आत्मधनाची जाणीव होईल. ते आत्मधनही त्यांच्याच चरणीं समर्पित करणं म्हणजे तन, मन आणि धनाचं पूर्ण समर्पण. मग सर्व काही ज्याला हे साधेल तोच ‘आपुलें मरण पाहिले म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।।’’ म्हणू शकेल.

नामबाण

एकदा रामाने हनुमंताला विचारले
"हनुमंता, माझ्या रामबाणापेक्षा
जास्त प्रभावी शस्त्र तू कुठे पाहिले
आहेस काय?"
याचे उत्तर नाही असेच अपेक्षित होते.
पण हनुमंत म्हणाला ,
"हो पाहिले आहे".
या उत्तरावर प्रभूंनी आश्चर्य दाखविले.
ते म्हणाले,"माझा रामबाण,ज्याला
मारायच त्याचा कधीही न चुकता
बरोबर वेध घेऊन माझ्या भात्यात
परत येतो. शिवाय तो मारलेल्याला
मुक्ती पण देतो. यापेक्षा दुसरं मोठ
प्रभावी शस्त्र कोणतं असणार?"
त्यावर हनुमंत म्हणाला,"यापेक्षा
मोठं शस्त्र मी भरताकडून घेतलं आहे.
रामबाणापेक्षा प्रभावी असं ते शस्त्र
म्हणजे 'नामबाण'!रामबाण हा मारून
मुक्ती देतो पण नामबाण हा जिवंतपणीच मुक्ती देतो.शिवाय,तो
कोणतीही पीडा निर्माण करतं नाही."

*नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे*

*नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे*

सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय.

चार माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता. पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले, त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले, त्याच्याहीपेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले, आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे, नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल.

Tuesday, 12 December 2017

गुरुकृपा

||ॐ सदगुरु कृपा ||
नाम म्हणजे काय?
आपले सद्गुरु ज्यावेळी आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात त्यावेळी ते आपल्याला नाम देतात हे नाम सर्वासाठी सांगता येत नाही ते फक्त सद्गुरु व शिष्य यांचातच राहते जे प्रकट रूपात येते त्याला मंञ म्हणतात उदाः हरे राम हरे राम हा मंञ आहे नाम नाही आणि या मंञाने तसा फरक पडत नाही फक्त एक गोष्ट चागंली घडते कि मनुष्यप्राणी चांगल्या मार्गाला लागतो मुक्ती मिळत नाही पंरतु तेच जर सद्गुरू मुखातून प्राप्त झाले तर तेच नाम होय
शिष्य त्या नामाचे चिंतन मनन व ध्यास करत करत तदरूप होतो त्यावेळेस त्याला काही स्वर किंवा नाम मिळते त्याला सबीज नाम म्हणतात तेच नाम हा शिष्य सद्गुरु पदाला पोहोचल्यानंतर आपल्या शिष्याला ते बीजनाम देतात तेव्हाच पुढील क्रिया घडायला सुरवात होते नामाला काळवेळेचे कुठलेही बंधन नाही ते कोठेही उठता बसता झोपता पत्नी सोबत असता घेऊ शकता माळ घेऊन जगाला जप करतो असे अजिबात दाखवू नका कारण आध्यात्मिक जीवनासाठी बाह्य आचरणापेक्षा आतंरीक  (भावभक्ती )आचरणाला जास्त महत्व आहे आपण काय करतो यापेक्षा कोणत्या भावनेने ते जास्त महत्वाचे आहे मग एखाद्या नास्तिक म्हटला तरी चालेल त्याला तुकाराम महाराज म्हणतात ऐसै कैसै झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू किंवा ऊस डोगा परी रस नव्हे डोगा काय भुललास वरलीया रंगा किंवा साध्या भाषेत वरून किर्तन व आतून तमाशा अशी परिस्थिती नको
आध्यात्मिक जीवनात भाव भक्ती श्रद्धा आचरण याला जास्त महत्व आहे
*चैतन्य गुरुआई नमो नमः*

कुंडलिनी शक्ती

🍁🍁 *कुंडलिनी शक्ती* 🍁🍁

कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणार्‍या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्‍या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे योग्याचे ध्येय.

ही कुंडलिनी जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंध, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इ. प्रकारांनी जागृत होते.
हठयोगातील प्राणायाम व बंध यांचा कसा उपयोग केला जातो याचा थोडासा विचार पुढे केला आहे.साधे एक, दोन, तीन शिकावयास गुरू लागतो. तेव्हा इथे गुरूची व कठोर परिश्रमाची नितांत गरज आहे. इथे आपण फक्त प्राथमिक माहिती बघणार असल्याने अत्यंत थोडक्यात काही गोष्टींची नोंद करू.
प्राणायाम ... श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवणे. पूरक (बाहेरचा वायू नासापुटाने उदरात भरून घेणे), कुंभक (पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणे) , रेचक (उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणे) व यांमधील विराम म्हणजे प्राणायाम. श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, श्वास सोडा, थोडा वेळ थांबा, परत श्वास घ्या ही प्रक्रीया. यातील निरनिराळे प्रकार म्हणजे उदा. एका नाकपुडीने श्वास घ्रेऊन दुसर्‍या नाकपुडीने सोडणे. ही शारीरिक प्रक्रीया झाली. याला म्हणावयाचे अगर्भ प्राणायाम. जर आपण प्रणवाच्या मात्रांचे, पूरकाच्या वेळी "उ"चे कुंभकाचे वेळी "म्" चे व रेचकाचे वेळी "अ"चे ध्यान केले तर तो झाला सगर्भ प्राणायाम.
प्राणायामाने आरोग्य सुधारते, अनेक रोग बरे होतात, आयुष्य वाढते असे शारीरिक फायदे होतात व वृतीला स्थिरपणा येतो,चांचल्य कमी होते, रज-तम वासना कमी होतात, सत्व गुणाचा प्रकाश पसरतो असे आध्यात्मिक लाभ होतात. हठयोगात नाडीशुद्धी हा एक मोठा फायदा. नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. अशी समाधी म्हणजे नादानुसंधानी समाधी. या मार्गावर पोचण्यास प्राणायामास यम-नियम-ध्यानादिंची जोड आवश्यक असते.

बंध ... . कुंभकाचे वेळी प्राणनिरोध करीत असतांना नवद्वारांपैकी काही द्वारे बंद करावयाची असतात. त्या वेळी या बंधांचा उपयोग होतो. शरीरातील एखाद्या विशिष्ट भागातून वायू खेचून दुसर्‍या एखाद्या भागात स्थिर करण्या साठी बंधांचा वापर होतो. . हठयोगात "बंधां" ना फार महत्व आहे. प्राणायामाने प्रभुत्व मिळवलेला प्राणवायू आपल्याला पाहिजे तेथे, पाहिजे त्या नाडीत नेणे, तेथे तो थांबविणे हे या बंधांचे काम. निरनिराळ्या आसनांत हे करतात. शरीरातील वायूंवर विजय मिळवूवच त्यांच्या सहाय्याने कुंडलिनीला जागृत करावयाचे असल्याने बंधांचा अभ्यास अनिवार्य आहे.आपण तीन बंध बघणार आहोत

जालंधर बंध ... कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधर बंध होतो.कंठस्थानी असलेल्या शिरांचे जाळे बांधले जाते म्हणून याला जालंधर बंध म्हणतात.आणखी एक विचार. मूर्धस्थानी असलेल्या पूर्णचंद्रातून स्त्रवणारे अमृत देहाच्या मध्यभागी आले की जाठराग्नीने शुष्क होऊन जाते. याच कारणाने देह लवकर जीर्ण होतो. जालंधर बंधाने अमृत सरळ पचन मार्गात न उतरता सर्व शरीरभर पारते व योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाही. (योगी काही शतके जगू शकतो याचे कारण ?)
उड्डियान बंध ... हा बंध उदरस्थानी करावयाचा असतो. नाभिस्थानाचा खालचा भाग व वरचा भाग अशा या दोनही
भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठ्वंशाकडे खेचून घ्यावे. पाठीला पोक येऊं न देता सर्व शरीर ताठ ठेवावे. यालाच उड्डियानबंध म्हणतात. या बंधाने पोट नेहमी साफ राहते. ज्याचे पोट साफ़ त्याचे आरोग्य उत्तम. याला "मृत्युमातंगकेसरी" म्हटले आहे व याच्या अभ्यासाने "वृद्धोsपि तरुणायते" वृद्धही तरुण होतो असे म्हटले आहे. उड्डियान बंधाने प्राण, अपान,व्यान,उदान व समान या पाचही वायूंची कार्ये सुव्यवस्थित होत असल्याने शरीराचे सर्वांगिण आरोग्य सुरक्षित रहाते म्हणून "सर्वेषामेव बंधानामुत्तमोह्युड्डियानक:" असा याचा गौरव केला आहे.
मूलबंध ...सिद्धासनात सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या (उपस्थ व गुदद्वार यांच्यामध्ये असलेली शीर) मध्यभागी दाबून बसवावी. गुदद्वाराचे अधिकात अधिक आकुंचन करूनपान वायूला वर खेचावे. शरीर ताठ ठेवावे. दृष्टि नासाग्री असावी. मूलबंधाने अपान वायू हा उर्ध्वगामी होत असतो. अनाहत ध्वनी अभिव्यक्त होण्यास मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो.
आपण नेहमी श्वासोच्छ्वास करतो तेव्हा डाव्या व उजव्या नाकपुडीतून आत येणारा वायु ईडा व पिंगला नाडीतून प्रवास करत असतो. प्राणायामाच्या अभ्यासाने व बंधांच्या उपयोगाने आपण ही नैसर्गिक क्रिया बदलून टाकतो. आता ईडा व पिंगला यांचा वापर बंद करावयाचा आहे .त्या ऐवजी सुषुम्ना नाडीतून प्राणवायू न्यावयाचा आहे. पण सुषुम्नाचे तोंड तर बंद असते. ते उघडण्यासाठी प्रथम बंधांच्या सहाय्याने उर्ध्वगामी, वर जाणारा प्राणवायू खाली वळवावयाचा व मूलबंधच्या उपयोगाने खाली सरणारा अपान वायु उर्ध्वगामी करावयाचा. प्राणवायू व अपानवायू यांचा संगम नाभीच्या अधोभागी होतो. त्यांच्या समागामाने स्वाधिष्ठानचक्रातील व मणीपूरचक्रातील अग्नी प्रदिप्त होतो. ह्या अग्नीच्या तापाने कुंडलिनी जागृत होते व सुषुम्ना नाडीचे तोंड उघडते. प्राण व अपान सुषुम्ना नाडीतून वर जाऊ लागले की नाद उत्पन्न होतो. तोच अनाहत नाद. वर लिहले आहे की अनाहत नाद ऐकू येऊ लागला की समजावे की तुम्ही ध्येयाच्या जवळ पोचला अहात. तुम्ही त्यापासून मिळणार्‍या आनंदात बेहोष होता. अनेक संतांनी या अनाहत नादाबद्दल रम्य अभंग लिहले आहेत. आता सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले आहे, कुंडलिनी जागृत झाली आहे व ती आता आपले मूलाधार चक्रातील स्थान सोडून वर सह्स्रारचक्राकडे निघाली आहे. पुढील भाग मी रुक्ष गद्यात सांगणार आहेच पण माझा आग्रह आहे की आपण तिच्या प्रवासाचे वर्णन श्री माउलींच्या शब्दात वाचावेच. गीतेत कुंडलिनीचा उल्लेखच नाही पण या बालयोग्याने अध्याय ६ मध्ये आपल्या नाथपंथातील विचार मोठ्या रसिकपणाने मांडले आहेत. परत एकदा, वाचाच.

कुंडलिनी ...मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. आता ती प्राण-अपान वायूंच्या संयोगाने निर्माण झालेल्या अग्नीच्या तापाने जागृत होते. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वर सहस्रारचक्रात जाण्यास प्रवृत्त होते. तिच्या बरोबर प्राणवायू व साधकाचे मनही असतात. तिचा मार्ग तेव्हढा सुकर नाही. तिला जातांना वाटेतील षटचक्रांमधून (चित्र पहा) पुढे जावयाचे असते. ही महाकठीण क्रीया सद्गुरूच्या सहाय्यानेच शक्य होते. वर वर जातांना कुंडलिनी जे जे पार्थिव ते ते सर्व सर्व गिळंकृत करते. जेव्हा प्राण-मन यांच्यासह ती सहस्रारचक्रात वास करणार्‍या शिवाशी एकरूप होते तेव्हा साधकाला समाधीचा अनुभव प्राप्त होतो. साधकाचे मन ब्रह्मात लीन होते व विषयविचारापासून तो पूर्णत: अलिप्त होतो. समाधी बद्दल इथे लिहण्याचे कारण नाही. तो एक निराळाच विषय आहे. पण कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोशक्यात बघू. प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच तो ईडा- पिंगला मधून वाहणे कमी होते. साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी होऊ लागतो. त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो. ( याला Hybernation म्हणावयाचे काय ?) प्राणवायू मूर्धस्थानी स्थिरावला की त्याला केवलकुंभक म्हणतात. आचार्य म्हणतात "केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीला येण्यासाठी चित्तची शुद्धी, सावधानता आणि अभ्यासाची धृढता यांची गरज आहे."
ही झाली कुंडलिनीची प्राथमिक माहिती. हिच्यावर प्रभुत्व मिळाले तर तुम्ही समाधी सुख मिळवू शकता. पण अपार कष्टाने मिळवलेल्या या सुखात विघ्नेही आहेत. तुम्हाला अनेक सिद्धीं प्राप्त होतात. त्यांची यादी देत नाही परंतु इहलोकातील नानाविध सुखे तुमच्या पायाशी लोलण घेतात व साधक त्यांतच गुरफटण्याचा संभव असतो. तंत्रग्रंथांत या विषयी धोक्याच्या सुचना दिलेल्या दिसतात. आपला त्याच्याशी काही संबंध नाही म्हणा.

*चैतन्य गुरुआई नमो नमः*

शंकर महाराज व कान्हेरे गुरुजी

श्री शंकर महाराजांच्या अनेक शिष्यांपैकी एक असलेले कान्हेरे गुरुजी. यांच्यावरती पण महाराजांनी बरीच कृपा केली होती. त्यातला एक प्रसंग.

महाराजांच्या महासमाधीच्या आदल्या दिवशी महाराजांनी कान्हेरे गुरुजींना संध्याकाळी ७:३० वाजता जेवावयास बोलावले होते. गुरुजी जाण्यास निघणार एवढ्यात एक कीर्तनकार त्यांचा तबलजी न आल्याने गुरुजींना साथ देण्यासाठी घेऊन गेले. कीर्तन रात्री १० वाजता संपल्यावर गुरुजी महाराजांकडे गेले. महाराज त्यांची वाट बघत होते.

महाराजांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि म्हणाले " केवळ वीस रुपयांसाठी केवढो मोठी संधी गमावलीस "

गुरुजी हात पाय धुवून पाटावर बसले. तेवढ्यात दागिन्यांनी मढलेली अत्यंत रूपवान ,लावण्यवती ; जिच्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील अशी सूंदर स्त्री आली आणि तिने गुरुजींना जेवण वाढले. त्या सुंदर स्त्री कडे गुरुजी काही काळ बघतच राहिले. तेव्हा महाराज म्हणाले " अरे ताटाकडे बघ "

गुरुजी थोडे शरमिंदा होऊन मान खाली घालूनच जेवायला लागले. ते जेव्हा हात धुण्यासाठी आत गेले तेव्हा ती स्त्री तिथे नव्हती. एकच दरवाजा असलेली खोली ;ती बाई गेली कुठे ? असा विचार गुरुजींच्या मनात आला. तसेच आतील खोलीत ६/७ उष्टी ताटे पडलेली होती.

ते पाहून गुरुजींनी महाराजांना विचारले " महाराज कोण कोण आले होते जेवायला ? "

महाराज : मी उद्या जाणार म्हणून स्वतः स्वयंपाक केला आणि जेवायला श्री साईबाबा ,श्री गजानन महाराज ,श्री साटम महाराज ,श्री स्वामी समर्थ या साऱ्यांना बोलावले होते. असा हा अमृत तुल्य दर्शनाचा सोहळा तुला घडावा म्हणून तुला बोलावले होते.

गुरुजी : पण महाराज त्या बाई कोण होत्या ? चटकन निघून गेल्या . गुरुजींनी न राहवता विचारले.

महाराज : अरे तुला जेवण वाढण्यासाठी साक्षात " कोल्हापूरच्या महालक्ष्मीला " थांबवले होते. तू खरोखरच भाग्यवान आहेस. आणि ऐक उद्या मी जाणार आहे तेव्हा तू इथे अजिबात यायचे नाहीस तुला ते सहन होणार नाही.

आपल्या सद्गुरूंचा हा शब्द मात्र गुरुजींनी पाळला. महासमाधीच्या दिवशी गुरुजी महाराजांकडे गेले नाहीत.

श्री शंकर महाराजांनी अशा आपल्या भक्तावर आईच्या मायेने  प्रेम केले आणि अनेक अनुभूती दिल्या.

---अल्लख निरंजन 🙏🙏

जे तुला शिकता आले नाही

*जे तुला शिकता आले नाही*
-----------------------------------------

एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला. रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला.

गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले.  गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’

*तात्‍पर्य –*  आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.

अनुभव - ह भ प उत्तम महाराज गुंड

नमस्कार बंधू-भगिनींनो
     आज मी एक विडिओ पाठवत आहे तो आपण अगदी शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती आहे, हा विडिओ *ह.भ.प.उत्तम महाराज गुंड, ता-नेवासा*  ( ख्यातनाम कीर्तनकार व प्रवचनकार आहेत तसेच दरवर्षी पंढरीची पायी वारी ते करतात )यांचा असून त्यांना  काही असह्य व गंभीर अशा प्रसंगातून आमच्या *सद्गुरू गुरुआई* यांनी कसे बाहेर काढले याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याच शब्दात तो त्यांनी सांगितला आहे कृपा करून तो आपण पूर्णपणे पाहावा हि विनंती आहे.


सोन्याचा डोंगर

सोन्याचा डोंगर गोरक्षनाथांनी केला.

मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करून श्रीशिवाचें पूजन केलें. पुढें आंवढयानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरुन तीर्थे केल्यावर महारण्यांत गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचें स्थान आहे, तेथें ते आले. तें अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळें मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचें कारण असें होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीनें जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजूं देतां त्याने झोळींत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीनें त्याच्या जिवांत-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठींच होती, नाहीं तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी कीं, ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाहीं ना ? हें ऐकून गुरुला चोराचें भय कशासाठीं असावें, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनांत उत्पन्न झाली. गुरुजवळ कांहीं तरी वित्त असलें पाहिजे व तें चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्यानें तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनांत विचार करून तो कांहीं उत्तर न देतां तसाच मुकाटयानें चालत होता. इतक्यांत त्यांस एक पाण्याचें ठिकाण लागलें तेथें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितलें व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हां गोरक्षनाथानें गुरुच्या झोळींत पाहिलें तों सोन्याची वीट दिसली. तेव्हां हेंच भीतीचें मूळ असें जाणून त्यानें ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरुन ठेविला व आपण चालूं लागला. मच्छिंद्रनाथहि मागून तांतडीनें शौचाहून आल्यानंतर चालूं लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पहात विसांवा घेत बसला, इतक्यांत एक विहीर त्याचे नजरेस पडली. तींत त्यानें स्नान केलें, मीननाथास स्नान घातलें व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत्‌ ’येथून पुढें कांहीं भय वगैरे नाहीं ना ?’ असें विचारुं लागला. त्यावर ’भय होतें तें मागें राहिलें, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावें’ असें गोरक्षनाथानें उत्तर दिलें.
अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हां गोरख सांगूं लागला तेव्हां मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्यानें आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. तें ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आतां आपल्याजवळ नाहीं म्हणून भय देखील नाहीं ! हें ऐकून कांहीं तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हां गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनीं आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाहीं असें पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्यानें एकच गोंधळ केला. त्या दुःखानें तो गडबडां लोळूं लागला व मोठमोठयानें रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरुं लागला. त्यानें गोरक्षास नाहीं नाहीं तें बोलून शेवटीं निघून जा. तोंड दाखवूं नको, इतकें सुद्धां सांगितलें.
मच्छिंद्रनाथाचे तें काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरुन त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षानें सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळें तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितकें सुवर्ण नेण्यास त्यानें गुरुस विनंति केली. तें अघटित कृत्य पाहून त्यानें गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशीं धरुन म्हटलें, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करुं ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानें त्याची पुष्कळ वाखाणणी केली.

गुरुदेव दत्त

🍁🍁 *गुरुदेव दत्त* 🍁🍁

दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय.

श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.

श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे.

महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'माणिकप्रभु' हा तिसरा व 'श्री स्वामी समर्थ महाराज' हा चौथा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात.

दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते. 

गुरु

 गुरुंबद्दल थोडेसे ......

*चैतन्य गुरुआई नमो नमः*

गुरु शिष्य परंपरा आपल्यापैकी कोणालाच नवी नाही.

मी कोणाला गुरु मानला म्हणजे ती व्यक्ती, सदेहि असलेला मानव असू शकतो. सदेहि नसलेला मानव असू शकतो. संत मंडळींपैकी कोणी असू शकतो. किंवा स्वामींसारखे अवतारी असू शकतात.

आता मी माझे गुरु मानले  म्हणजे मी त्यांचा शिष्य झालो. आता ह्यात परत दोन मुख्य प्रकार करता येतील. एक म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने अनुग्रह किंवा दीक्षा घेतलेला शिष्य. आणि दुसरा म्हणजे स्वयंघोषित शिष्य. आपण सर्व स्वामीभक्त दुसऱ्या प्रकारात येतो. अर्थात आध्यात्मात पहिला प्रकार उच्च प्रकारचा मानला जातो. ह्यात गुरु शिष्याचा थेट संवाद असतो किंवा घडलेला असतो. गुरूने दीक्षा किंवा अनुग्रह देण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यात ९ प्रकार मुख्य धरले जातात. असो…थोडे गुरुबद्दल बोलू.

मी गुरु करण्याचे किंवा मानण्याचे मला पूर्ण स्वातंत्र्य असते. पूर्ण विचारांती मी ते काम करावे ही आध्यात्मिक अपेक्षा आहे. मात्र एकदा का मी गुरु केला की त्याची कास मी सोडू नये. मला अनेक गुरु करण्याचे स्वातंत्र्यही आहे. पण कोणत्याही केलेल्या किंवा मानलेल्या गुरूची कास मात्र कधीही सोडू नये.

वेगवेगळे गुरु करण्यामागे ज्ञानार्जन सोडून दुसरे कोणतेही कारण नसावे. हल्ली एक पाहायला मिळते. बरेचजण गुरु करतात. त्याची भक्ती, पूजा सगळे चालते. हवा असलेला अनुभव न आल्याने विश्वास ( जो मुळातच कमकुवत असतो) डळमळू लागतो. ह्या नात्याला आणि भावनेला आध्यात्मात स्थान नाही.

तेव्हा गुरु करताना तो विचारपूर्वक करावा. तो करताना आणि त्यानंतरही आपण जमेल तेवढे अपेक्षाविरहित असावे. मी गुरु केला म्हटल्यावर त्याचे फळ मला कधीना कधी मिळेल ही अपेक्षा गुरुशिष्य नात्यास घातक असते.

जन्मल्यापासून कळत नकळत आपण बरेच गुरु करतो किंवा त्यांच्या सान्निध्यात येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो, की किती प्रकारचे गुरु असतात? त्याचे उत्तर संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे देता येईल.

गुरु हे मुख्यतः दोन प्रकारचे असू शकतात. एक अंतर्गत आणि एक बहिर्गत. पण एक सच्चा शिष्य बहिर्गत गुरूस कालांतराने त्याचा अंतर्गत गुरु होण्यास भाग पाडतो.

पिश्चीला नावाचे आध्यात्मात एक तंत्र ( हे तंत्र मंत्र मधील तंत्र नव्हे) आहे. त्यानुसार गुरु हा दोन प्रकारचा असतो. एक असतो दीक्षा गुरु आणि एक असतो शिक्षा गुरु.

तसेच कुलागम नावाचे आध्यात्मात अजून एक तंत्र आहे. त्यानुसार गुरु हा ५ प्रकारचा असतो.

प्रेरक, सूचक, वाचक, दर्शक, बोधक, शिक्षक हे ते ५ प्रकार.

गुरुचे आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवणे, त्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणे, किंवा सद्गुरूच्या जवळ जाण्याची वाट दाखवणे ही कर्तव्ये असतात. आता सगळ्या बाजूने विचार केल्यास ही सर्व कर्तव्ये योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन ह्यात मोडतात.

पण शिष्याचे तसे नसते. शिष्याची आपल्या गुरुसाठी खूप कर्तव्ये असतात. त्यातील सगळ्यात पहिले म्हणजे संपूर्ण शरणागती. शिष्याच्या कर्तव्याबद्दल नंतर बोलू. आज गुरुबद्दल.

योग्य गुरूंची काही स्वाभाविक लक्षणे असतात. अर्थात ही नसतील तर तो गुरु नाही असे नाही. पण त्यातल्या त्यात ही लक्षणे असतातच

१) सर्वप्रथम आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यात कधीही भेदाभेद करत नाही. एक प्रिय आणि दुसरा अप्रिय असे प्रकार गुरुच्या ठायी नसतात. तो सर्वस्वी शिष्यांचा दृष्टीकोन असतो.

२) आध्यात्मिक गुरु, शिष्यात एका ठराविक पातळीपर्यंतच भावनिक गुंतवणूक करतो. कारण अवास्तव  गुंतवणूक प्रसंगी त्याच्या कठोर भूमिकेच्या आड येऊ शकते.

३) आध्यात्मिक गुरु, आपल्या शिष्यांकडून कधीही, कोणत्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा ठेवत नाही किंवा तशी भेट इत्यादी स्वीकारत नाही.

४) बरेचदा शिष्यास, आपला गुरु तिरसट, रागीट, तुसडा वाटतो. ते बऱ्याचअंशी पूर्वनियोजित असते.

५) एक गुरु कधीही, गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दुसऱ्या गुरूची निंदा किंवा मस्करी करत नाही.

६) गुरु हा प्रसिद्धीपासून लांब राहणारा, स्वतः किंवा आपला शिष्यसमुदाय किती मोठा वगैरे बोलण्याच्या भानगडीत पडत नाही.

अशी अनेक लक्षणे सांगता येतील. असो. गुरुशिष्य परंपरेत जसे शिष्याला तसे गुरूलाही काही नियमाचे पालन करावेच लागते. त्यापैकी बरेचसे नियम आदी शंकराचार्य ह्यांनी लिहिलेल्या मनीषा पंचाकम ह्या ग्रंथात आहेत. काही खाली देतोय

१) आपल्या शिष्यास काय आणि किती उपासना, कधी पेलेल,  ह्याचे भान गुरूस नेहमी ठेवावयास लागते. शिष्याच्या प्रगतीनुसार किंवा कुवतेनुसार त्यास योग्य मार्गावर पुढे पुढे ढकलावे लागते.

२) शिष्याचा योग्य हट्ट योग्य वेळी पुरवणे हे गुरुचे सगळ्यात आवडते कार्य पण ते तेवढेच सांभाळून करावे लागते.

३) गुरु आपल्या शिष्याचे कोणत्याही परिस्थितीत, केव्हाही आणि कधीही वाईट चिंतु शकत नाही. त्याची त्यास परवानगी नाही.

४) गुरु शिष्यास शाप देऊ शकतो पण त्या शापाचा उः शाप माहित असेल तरच…

५) गुरु आपल्या शिष्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू शकत नाही अगदी सेवेचीसुद्धा. आध्यात्मात गुरुदक्षिणा घेत नाहीत. ती शिक्षणात घेतात.

 वरील सर्व, आध्यात्मिक गुरूस लागू होते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू इथे नाही. नकळत तसे माझ्याकडून घडल्यास मोठ्या मनाने माफ करावे.